|| पुरातन कालीन श्री रामवरदायिनी मंदिर चोरवणे ||
*श्रीरामवरदायिनी* आई नवसाला पावणारी,आई हाकेला धावणारी , आई चोरवणे गावची श्रीरामवरदायिनी....!!धृ!! विश्वतारणी जगत जननी वरदायिनी , जगभर ख्याती आदिशक्ती नावानी, देवीला मान देऊ ओटी भरुनी..... आई चोरवणे गावची श्रीरामवरदायिनी.......!!१!! परशुरामाच्या भूमितले तीर्थस्थान, भक्तांनसाठी बनली देवी श्रध्दास्थान , ठेवी छाया कृपेची भक्तांनवरी..... आई चोरवणे गावची श्रीरामवरदायिनी....!!२!! भक्तांवरती आहे आई तुझी मालकी, शिमग्या सणाला सजवू तुझी पालखी गेल्या वर्षीचा नवस फेडू हात आधी जोडुनी.... आई चोरवणे गावची श्रीरामवरदायिनी.......!!३!! थोर आहे तुझी महती आई तुझ्या नावाची, सुदर्शन ने काव्य रचले आवड त्याला चोरवणे गावची, होतो नतमस्तक सदैव तुझ्या चरणी...... आई चोरवणे गावची आई श्रीरामवरदायिनी......!!४!! लेखक:- श्री .सुदर्शन शांताराम जाधव चोरवणे, खेड जि. रत्नागिरी
|| आई चोरवणे गावांची शान || या चोरवणे गावांची शान, आई तुझे देऊळ || आम्हां भक्त जणांचा मान, आई तुझे देऊळ ||धृ|| गावांमध्ये देऊळ तुझे, डोंगरातून आली || ब्रम्हांडाची देवी तू, ब्रम्हांडातून आली || भक्त जणांचा उध्दार, कराया गावांमध्ये आली || ठेवले वरदायिनी तुझे नाव, आई तुझे देऊळ || आंम्हा भक्त जणांचा मान, आई तुझे देऊळ ||धृ|| गरीब असो वा श्रीमंत, येतो तुला शरण || दुःखी असो वा संकटी, सांगे तुला गाराणं || होई भक्तांचे समाधान, आई तुझे देऊळ|| आम्हां भक्त जणांचा मान, आई तुझे देऊळ ||धृ||by चंद्रकांत (भाई) मोरे विरार
पुन: पुन्हा याल...येतच राहाल,
आई वरदायिनीचा महिमा; एकदा याचि देही अनुभवाच!
निसर्ग सौंदर्याने डवरलेल्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या चोरवणे गावातील वरदायिनी देवीचे नयनरम्य आणि भव्य मंदिर भाविकांना खुणावत असते. लाकडी वाश्यांवर गवताच्या चादरी आणि मंगलोरी कौलांनी शाकारलेल्या या पुरातन मंदिराचा नजिकच्या काळात ग्रामस्थांनी जिर्णोध्दार केला. कोल्हापुरहून दगड आणून काळ्या पाषाणात कोरलेले खांब, कर्नाटकातून तज्ज्ञ शिल्पकारांनी पौराणिक कल्पना आणि दृष्टांतांच्या आधारे घडवलेल्या मूर्त्या यामुळे आधीच दिव्य तेजाने स्फुल्लिंग चेतवणारी आई वरदायिनी ही नवा साज ल्यायल्यानंतर अधिक तेजाने तळपू लागली आहे. वरदायिनीचे मूळ स्वरुप म्हणजे ही देवी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या भवानीमातेचे दुसरे रूप म्हणून परिचित आहे.
खेड पासून ६५ किलोमीटर आणि चिपळूण पासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या चोरवणे या टुमदार गावांबद्दल सांगायचे तर, परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत सह्याद्री पर्वताच्या माथ्यावर स्वयंभू नागेश्वराचे मंदिर आहे. या नागेश्वराच्या मंदिरापासून वसिष्ठी नदीचा उगम होतो. याच नागेश्वराच्या पायथ्याशी चोरवणे गाव वसले आहे. या निसर्गरम्य गावातील ग्रामदेवता वरदायिनीमाता आदिशक्तीचे रूप म्हणून प्रसिद्ध आहे. देवीचे वार्षिक परंपरेप्रमाणे होणारे सणवार भक्तिभावाने, श्रद्धेने साजरे केले जातात. देवीचे मंदिर हेमांडपंथी असून, ते पाषाणी कोरीवकाम आणि कलाकुसरीचा एक सुरेख नमुना आहे. देवीची मूर्ती कर्नाटक येथून घडवून आणण्यात आली आहे. या जागृत देवीचा महिमा ऐकून येणार्या तसेच इथल्या स्थानिक ग्रामस्थांच्या नवसाला पावणारी अशी ही वरदायिनी मातेची ख्याती पंचक्रोशीतच नव्हे तर राज्यभरात पसरलेली आहे. कोकणातील ग्रामदेवतांच्या यात्रा हा मोठा विलक्षण सोहळा असतो. असाच दैदिप्यमान सोहळा अर्थात वरदायिनी देवीची यात्रा दरवर्षी चैत्र महिन्यात होत असते. यात्रेदरम्यान सायंकाळी देवीची आरती झाल्यानंतर रात्री पंचक्रोशीतील देव-देवतांच्या पालख्यांचे आगमन होते. ढोल-ताशांच्या गजरात मंदिराच्या सभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पालख्या नाचवत छबिना काढला जातो. हा परंपरागत विलक्षण सोहळा पाहण्यासाठी देश-विदेशातील अनेक पर्यटक आणि भाविक या लहानशा गावात आवर्जुन येतात.
चोरवणे गांव आणि अजुबाजुच्या परिसराला निसर्गाने भरभरुन मुक्तहस्ताने वरदान दिलेले आहे. जवळच नागेश्वराचे स्वयंभू मंदिर, वशिष्ठी नदीचे उगमस्थान, ऐतिहासिक वासोटा किल्ला आदी पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त अशी नैसर्गिक ठिकाणं आहेत. देवदर्शनासह कौटुंबिक सहलीच्या निमित्ताने एकदा चोरवणे गांवच्या वरदायिनी मातेच्या मंदिराला भेट द्या, पुन: पुन्हा याल...येतच राहाल, याची खात्री आहे.
- चंद्रकांत (भाई) मोरे ,
सह संपादक,
आकार क्रिएशन - विरार
श्री सुरेश रामजी शिंदे, अध्यक्ष ग्रामविकास मंडळ चोरवणे मुंबई (मर्या.)
ई मेल : suresh@nfplonline.com
फोन :९९६७६८९७४५